Home क्राईम रावेर पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रूपयांचा गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक !

रावेर पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रूपयांचा गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक !


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात अवैधरीत्या आणण्यात आलेल्या गुटख्याच्या एका मोठ्या साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या घटनेमुळे रावेरमधील गुटखा तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथून (एमएच ०४ एचएन १७०९) क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या गाडीतून गुटख्याचा मोठा साठा रावेर शहरात आणला जात होता. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वस्तिक टॉकीजजवळील बऱ्हाणपुर रोडवर छापा टाकून ही गाडी ताब्यात घेतली.

गाडीची तपासणी केली असता, त्यात एकूण २ लाख ३४ किमतीचा गुटखा आढळून आला. यामध्ये १८७ प्रति पाकीटप्रमाणे ३ मोठ्या गोण्या, ३३ प्रति पाकीटप्रमाणे ३ गोण्या, १९८ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या, २२ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या असा गुटखा होता. या गुटख्यासोबतच गुटखा वाहून नेणारी चार लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली, ज्यामुळे एकूण ६ लाख ३४ हजहार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात शेख मुजाहिद शेख रफिक (अटक), आसिफ अहमद जमील अहमद, कल्लू उर्फ मोहसिन शेख युनुस शेख आणि एक अनोळखी इसम अशा चार आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर आणि फैजपूर पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली. यात सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अविनाश चौधरी, पो.कॉ. सुकेश तडवी, संभाजी बिजागरे, विकारुद्दीन शेख, महेंद्र महाजन व गणेश मनुरे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे मध्य प्रदेशातील एका मोठ्या गुटखा माफियांना लवकरच अटक होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. रावेर शहरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound