रावेर, प्रतिनिधी | येथील नगर पालिका हद्दवाढीच्या अंतिम अधिसूचनेचा आदेश नुकताच नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी काढला आहे, यामुळे ग्रामीण भागाच्या नागरिकांना नगर पालिकेच्या माध्यमातून मूल-भूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. नगर पालिकेच्या अंतिम हद्द वाढीच्या निर्णयाचे ग्रामीण भागातील जनतेने स्वागत केले आहे.
यापूर्वी नगर पालिकेची हद्दवाढ झाल्याची घोषणा २ मार्च २०१९ रोजी झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हद्दवाढीवर काही हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे अंतिम अधीसूचनेला उशीर झाला होता. त्यामुळे दि. ४ नोव्हेंबर रोजी अंतिम हद्दवाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे श्रीकृष्ण नगर, प्रोफेसर कॉलनी, उटखेड़ा रोड, तडवी नगर, पिपल बँक कॉलनी, सौभाग्य नगर, पंचमुखी हनुमान नगर, रामचंद्र नगर, मानकर नगर, विद्या नगर, महात्मा फुले, शिवाजी चौकातील ग्रामीण भाग स्वस्तिक नगरसह परिसरातील सर्व कॉलन्या आणि नगरे, यापुढे नगर पालिका हद्दित येणार आहेत.