रावेर/यावल शालीक महाजन-अय्यूब पटेल । काल मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर वाहन उलटून झालेल्या अपघातात रावेर तालुक्यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यातील सर्वाधीक मयत हे आभोडा गावातील आहेत. या अपघातामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमएच १९ : झेड-३५६८ या क्रमांकाच्या आयशर वाहनाने काल सायंकाळी धुळे जिल्ह्यातील नेरी-कुसुंबा येथील पपई भरली. यानंतर हे वाहन रात्री रावेरकडे निघाले. रात्री साडेबाराच्या सुमारास चालक शेख जहूर बद्रुद्दीन मोमीन यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर उलटली. यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातामध्ये शेख हुसेन शेख मुस्लीम मन्यार ( वय-३०, रा. फकीरवाडा, रावेर); सरफराज कासम तडवी (वय- ३२, रा. केर्हाळा, ता. रावेर); नरेंद्र वामन वाघ (वय २५, रा. अभोडा, ता. रावेर); डिगंबर माधव सपकाळे (वय ५५, रा. रावेर); दिलदार हुसेन तडवी (वय-२०, रा. अभोडा, ता. रावेर); संदीप युवराज भालेराव ( वय-२५, रा. विवरा, ता. रावेर); अशोक जगन वाघ ( वय-४०, रा. आभोडा, ता. रावेर); दुर्गाबाई संदीप भालेराव (वय-२०, रा. आभोडा); गणेश रमेश मोरे (वय-५, रा. आभोडा); शरदा रमेश मोरे (वय-१५, रा. आभोडा); सागर अशोक वाघ (वय-३, रा. आभोडा); संगीता अशोक वाघ (वय३५, रा. आभोडा); सुमनबाई शालीक इंगळे (वय-४५, रा. आभोडा); कमलाबाई रमेश मोरे (वय-४५, रा. आभोडा) आणि सबनूर हुसेन तडवी (वय-५३, रा. रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.
रात्रीच्या सुमारासच पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनीही रूग्णालयाला भेट दिली.