रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उधारीच्या अवघ्या १३० रूपयांवरून तरूणाचा गुप्तांग पिळून खून करण्यात आल्याची भयंकर घटना तालुक्यातील ऐनपूर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ऐनपूर येथे रात्री भीमसिंग जगदीश पवार ( वय २८) या तरूणाचा खून झाला. वैयक्तीक वादातून हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ऐनपूर येथे पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. काल रात्री उधारीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. यामुळे अवघ्या १३० रूपयांसाठी भीमसिंगचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागीय पोलिस अधिकार्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.