Home क्राईम रावेर तालुक्यात दोन साधूंना बेदम मारहाण : पालघरची पुनरावृत्ती टळली

रावेर तालुक्यात दोन साधूंना बेदम मारहाण : पालघरची पुनरावृत्ती टळली


सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना ते मुले पळवणारे असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पालघर येथे साधूंना मारहाण झाल्याचे प्रकरण खूप गाजले होते. त्याच प्रकारात तालुक्यातील मुंजलवाडी-लोहारा-कुसुंबा येथे हरियाणातील दोन साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, हरियाणातून जडी-बुटी घेऊन काही साधू रावेर तालुक्यात आले आहेत. यातील जस्सानाथ पुनुनाथ ( वय 60) आणि मोनूनाथ जस्सानाथ ( वय 20 ) दोन्ही राहणार सिरसा, हरियाणा हे आज सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी या गावात आले होते. त्यांनी गावातील एका व्यक्तीला नसा दुखत असल्याच्या व्याधीची तपासणी केली. यानंतर तो व्यक्ती घरी जाऊन इतर लोकांना घेऊन आला. हे दोन साधू मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमजातून त्यांना या लोकांनी मारहाण सुरू केली. यामुळे या दोन्ही साधूंनी त्यांच्याकडे असलेल्या एचआर 13 ई – 6516 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पलायन केले.

यानंतर हे दोन्ही साधून प्रचंड वेगाने मुंजलवाडी सोडून कुसुंब्याकडे पळाले. तेथे लोकांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण केली. यानंतर तेथून आपला जीव वाचवून ते वेगाने पळाले असतांना त्यांचा एका व्यक्तीला कट लागला. यानंतर परिसरातील लोकांनी लोहारा येथे या दोन्ही साधूंना गाठून त्यांना पुन्हा मारले. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाती तोडफोड देखील करण्यात आली.

दरम्यान, सावदा पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने या दोन साधूंची सुटका झाली. यामुळे पालघरची पुनरावृत्ती टळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सावदा पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील पहिला गुन्हा हा इकबाल मोहंमद तडवी यांनी दाखल केला असून त्यांना साधूंच्या गाडीचा कट लागल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तर दुसरी तक्रार ही साधूंच्या वतीने करण्यात येत असून यात त्यांना मारहाण करणाऱ्यांना आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


Protected Content

Play sound