रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्याशी करण्यात आलेल्या अरेरावीच्या निषेधार्थ आज (गुरुवार, १७ जुलै २०२५) फैजपूर व रावेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. बबनराव काकडे हे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून, त्यांच्याशी करण्यात आलेली अरेरावी अत्यंत निंदनीय आहे, असा सूर आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला. या आंदोलनामुळे दोन्ही तहसील कार्यालयांमधील कामकाज दिवसभर ठप्प झाले होते.
फैजपूर येथील उपविभागीय कार्यालयात कर्मचारी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर रावेर तहसील कार्यालयात देखील दिवसभर कामकाज पूर्णतः बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

या आंदोलनात निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, निवासी नायब तहसीलदार किशोर पवार, निवडणूक विभागातील विक्रम राठोड, अजित टोंगळे, भूषण कांबळे, घनश्याम राठोड, श्रध्दा गजरूशी, तलाठी स्वप्नील परदेशी यांच्यासह तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी आणि तलाठ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ तीव्र भावना व्यक्त केल्या.
घटनेची माहिती मिळताच रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी तातडीने फैजपूर येथे जाऊन अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, तहसील कार्यालयासोबतच पुरवठा विभागाचे कामकाजही पूर्णतः ठप्प झाल्याने शासकीय कामांवर मोठा परिणाम झाला.



