राऊत पुन्हा मैदानात : म्हणाले मुख्यमंत्री शिवसेनेचाच

sanjay raut

मुंबई, वृत्तसंस्था | भाजपविरुद्ध एकहाती किल्ला लढवणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आज यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून डिस्चार्जआधी माध्यमांशी तितक्याच आक्रमकपणे संवाद साधत ‘महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार’, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेले नाही, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला.

 

राऊत यांना आज दुपारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा व दगदग टाळण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. असे असले तरी आक्रमक बाण्याचे राऊत लगेचच कॅमेऱ्यापुढे आले आणि त्यांनी भाजपवर नव्याने तोफ डागली. मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊनही तो शब्द भाजपने पाळला नाही. सर्वात मोठा पक्ष असून भाजपला सत्तास्थापनेत यश आले नाही. नंतर स्वत:ला सरकार स्थापन करता येत नाही म्हणून त्यांनी इतरांनाही सरकार स्थापन करू दिले नाही आणि त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार ही अफवा असल्याचे सांगत तशी शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.

शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याची पत्रे सादर करू न शकल्याने शिवसेनेची संधी हुकली. त्याबाबत विचारले असता पत्रांबाबत थोडासा घोळ झाल्याने हे सगळे घडले असे राऊत म्हणाले. त्याचवेळी येत्या काळात सगळे काही सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांकडून अन्याय झाला असे वाटते का, अशी विचारणा केली असता राज्यपालांकडून सर्वांवरच अन्याय झाला आहे, असे राऊत म्हणाले.

Protected Content