अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे, वंचित नंतर आता राज्यातील महायुतीतील एक पक्ष स्वबळावर लढण्याची चाचणी करतोय. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. महायुतीचा घटक असलो तरी स्वबळावर लढण्यासाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली. ते अकोल्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापन दिन सोहळा गुरूवारी अकोल्यात साजरा होत आहे. त्या दृष्टीने जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या वक्तव्याला आता राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने संसदीय मंडळाला स्वबळावर लढण्याची शिफारस केली तर पक्ष त्या निर्णयासोबत असेल असे जानकर म्हणाले.
राज्यातील जे वंचित आणि उपेक्षित लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला पक्ष निवडणूक लढवत असल्याचे महादेव जानकर म्हणाले. ते म्हणाले की, राजकारणाच्या माध्यमातून उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा आमचा पक्ष आहे. गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच वंचित समाजाला संधी देण्यासाठी काम करणार.
विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जर रासपच्या राज्य कार्यकारिणीने घेतला तर सगळ्या जागा लढवून असे महादेव जानकर म्हणाले. महायुतीमधून निवडणूक लढवायची असेल तर त्या संदर्भात युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल. पण सध्या तरी २८८ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.