भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात राष्ट्र सेविका समितीच्या वतीने प्रथमच शस्त्रपूजन व महिला पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य हे समितीच्या ८९ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर साधण्यात आले होते. या भव्य आयोजनात शहरातील नागरिक, कुटुंबीय व समाजप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.

राष्ट्र सेविका समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा असून, महिलांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीचे जतन या मूल्यांची रुजवण करण्याचे कार्य गेली अनेक दशके करीत आहे. या समितीने ८९ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केल्याच्या निमित्ताने भुसावळ शहरात प्रथमच शस्त्रपूजनासह महिला पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजनाने झाली, ज्यामध्ये मातृशक्तीचा गौरव व्यक्त करण्यात आला.

या शस्त्रपूजनानंतर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शेकडो तरुणी व महिलांनी शिस्तबद्धतेने शहरात पथसंचलन केले. पथसंचलन मार्गावर स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या संचलनात महिलांच्या शौर्याची आणि एकतेची प्रचिती आली. सामाजिक सलोखा, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतिक असलेले हे संचलन अनेकांचे लक्ष वेधून गेले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या स्वतः उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या या भव्य आयोजनाचे कौतुक करताना सांगितले की, “देशाच्या संरक्षणापासून समाज परिवर्तनापर्यंत महिलांची भूमिका निर्णायक असून, अशा उपक्रमांमुळे त्यांना दिशा आणि प्रेरणा मिळते.” त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या कार्याची स्तुती करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे भुसावळ शहरात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलांनी केवळ समाजकारणात नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेतही सक्रीय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या उत्सवातून जनमानसात पोहोचविण्यात आला.



