रासेयो स्वयंसेवकांनी समाजसेवेचे व्रत अंगी बाणावे-डॉ. सचिन नांद्रे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | 18 जून 2024 रोजी मुक्ताई मंदिर कोथळी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर आणि संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्ताई पालखीच्या पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी व निर्मल वारी, हरितवारी,प्लास्टिक मुक्त वारी हा संदेश पोहोचविण्यासाठी डॉ. सचिन नांद्रे (रासेयो संचालक, क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव) यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करून या वारीप्रसंगी निर्मल वारी, हरित वारी,प्लास्टिक,कचरा मुक्त वारी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करून स्वयंसेवकांनी आपल्या जीवनात समाजसेवेचे व्रत अंगी बाणावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर युवकच देशाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावू शकतात असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमप्रसंगी रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांनी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरण संरक्षणाचे कार्य हाती घ्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने (ऐनपुर, महाविद्यालय), रासेयो विभागीय समन्वयक डॉ. नेहते, औटी नाना (रासेयो सहाय्यक, क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात खडसे महाविद्यालयाचे 53 स्वयंसेवक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यांनी वारीप्रसंगी उपस्थित वारकऱ्यांची सेवा करून मंदिर परिसरातील स्वच्छता केली तसेच वारकऱ्यांना प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त वारी करण्याचे आवाहन करून त्यांना निर्मल वारी, हरित वारी हा संदेश आपल्या कृतीतून दाखवून दिला.

याप्रसंगी खडसे महाविद्यालयातर्फे वारीतील वारकऱ्यांसाठी 5000 केळीची पाने जेवणासाठी उपलब्ध करून दिली गेली. या उपक्रमाप्रसंगी खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना स्वच्छतेचा बाणा अंगी बाळगण्याचे आवाहन केले. तसेच संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय. डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना वारकऱ्यांची निस्वार्थीपणे सेवा करण्याचा संदेश दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक बावस्कर (रासेयो, कार्यक्रम अधिकारी,खडसे महाविद्यालय) तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.व्ही.बी.डांगे (माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी,खडसे महाविद्यालय) यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी प्रा.डॉ. ताहिरा मीर (रासेयो महिला कार्यक्रमाधिकारी,खडसे महाविद्यालय) प्रा.डॉ.अजित कुलकर्णी (रासेयो,कार्यक्रम अधिकारी, संत मुक्ताबाई महाविद्यालय) प्रा. डॉ. वंदना लव्हाळे(रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी, संत मुक्ताबाई महाविद्यालय) तसेच खडसे महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक व संत मुक्ताबाई महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content