जालना (वृत्तसंस्था) सतत वादात अडकणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जालना येथे एका सभेत त्यांनी ”तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन,” असे वक्तव्य केले असून, त्यामुळे नवा वाद सुरु होणे शक्य आहे.
आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी जालना येथे विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेत आणि मला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत. आता तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन.” दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत जालना येथेच पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला होता. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा,” अशी मुक्ताफळे दानवे यांनी तेव्हा उधळली होती.