नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी | भुसावळ येथील नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक तथा संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांना येत्या १३ ऑक्टोबर (रविवार) रोजी नवी दिली येथे ‘राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी ह्यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिल्लीतील डॉ. आंबेडकर ओडिटोरियम येथे ‘आंतरराष्ट्रीय युवा परिषद’ होणार असून त्या परिषदेत खेल मंत्रालयातर्फे केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री किरण रीजिजू तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार देशात तथा जागतिक स्तरावर सामाजिक श्रेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवकांना दिला जातो. राजपूत यांनी शहरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती अशा विविध क्षेत्रात भरीव कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार संघ राष्ट्रीय प्रमुख डॉ.मनिष गवई ह्यांच्यातर्फे राजपूत ह्यांना याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. राजपूत यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भुसावळ पालिकेचे स्वच्छता दूत म्हणून कार्य केले होते. तसेच त्यांना यापूर्वीही काही राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.