रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘रंगपंचमी व्याख्यानमाले’ला आज सुरुवात झाली. पहिले वक्ते म्हणून सटाना येथील प्रांतधिकारी बबनराव काकडे यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले.
“युवकांनी स्पर्धा परीक्षा देतांना आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न नक्की बघा. परंतु अपयश आल्यास खचून न जाता प्लान ‘बी’ सुध्दा तयार ठेवा. आताच्या युगात नोकरी मिळविणे सोपे राहीले नसून यात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. युवकांनी यशस्वी होण्यासाठी व्यवसाय, उद्योग क्षेत्राकडेही आपले लक्ष केंद्रीत केले पाहीजे” असे मार्गदर्शन बबनराव काकडे यांनी उपस्थित युवक युवतींना केले
श्री काकडे पुढे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, “आताच्या स्पर्धा परीक्षामध्ये ११०० ते १२०० विद्यार्थी सिलेक्ट झाल्यास त्यांच्यापैकी एकालाच एमपीएससी किंवा यूपीएससी किंवा इतर शासकीय नोकरी मिळते. बाकीचे मुले निराश होतात. नैराश्यमध्ये जातात. काही विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या देखील बातम्या येतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेवर अवलंबून न राहता प्लान ‘बी’सुद्धा तयार ठेवा. युवक युवतींनी स्पर्धा परीक्षा देतांना अभ्यासात संपूर्ण लक्ष केंद्रीत करावे. मगच परिक्षा द्यावी. अन्यथा देऊ नका. मला सलग दोन राज्य सेवाच्या पूर्व परीक्षेत मला अपयश आले त्यामुळे खचून गेलो होतो. परंतु सततच्या वाचनामुळे मी स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊ शकलो. त्यामुळे पूर्ण जिद्दीने स्पर्धा परीक्षा द्यावे यश आले तर फारच चांगले” न आल्यास खचून न जाता व्यवसाय उद्योग करण्याचा सल्ला श्री. काकडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
रंगपंचमी व्याख्यानमालेला प्रमुख मान्यवर म्हणून प्रांतधिकारी कैलास कडलक, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरिक्षक कैलास नागरे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अनिल महाजन, विठोबा पाटील, डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य आदी. उपस्थित होते.