नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रावर आलेल्या उध्दव ठाकरेरूपी संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून आपण आज महाआरती करून हनुमानाला साकडे घातल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आज व्यक्त केली आहे.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आधी घोषणा केल्यानुसार, आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली. राणा दाम्पत्याने आज सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या घरापासून सुमारे २ ते २.५ किलोमीटर पायी मंदिरात जावून महाआरती केली आहे. यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांनी ’जय श्रीराम’ च्या घोषणाही लगावल्या.
महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना प्रतिपादन केले. मी घाबरणार नाही, थकणार नाही. महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणं हे मान्य नाही तसेच इतकी कमजोर देशातील स्त्री मुळीच नाही, महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. असं नवनीत राणा याप्रसंगी म्हणाल्या.