
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कामगार क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या जळगावच्या रामराव सीताराम तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

रामराव तायडे हे जळगाव येथील रहिवासी असून, सध्या ते हिताची अस्मेटो प्रा. लि. या आघाडीच्या खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेतून कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार देशभरातील कामगार क्षेत्रातील आदर्श ठरणाऱ्या व्यक्तीमत्त्वांना दिला जातो.
२७ जुलै रोजी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविकांत पाटील आणि ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंचावर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते श्री. तायडे यांना पुरस्कार, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे भव्य स्वरूपात करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या विविध उद्योगांतील कामगार प्रतिनिधींनी या सोहळ्यास मोठी उपस्थिती दर्शवली. श्री. तायडे यांच्या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या कामगार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या पुरस्काराने केवळ श्री. तायडे यांचेच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे युवा कामगारांमध्ये प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.



