जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील नाथसेन नगरात किरकोळ कारणावरून ५५ वर्षीय व्यक्तीला एकाने विट मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, देविदास सिताराम इंगळे (वय-५५) रा. नाथसेन नगर, रामेश्वर कॉलनी हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवार १९ मार्च रोजी देविदास इंगळे हे रात्री घरी असतांना त्यांच्या गल्लीत राहणारा राकेश सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) याला तू काय करतो असे विचारले. याचा राग आल्याने राकेश सपकाळे याने रस्त्यावर पडलेली विट देविदास इंगळे यांच्या डोक्यावर मारली. यात त्यांना दुखापत झाली. तर देवीदास इंगळे याचा मुलगा सतिश आणि सुन यांना शिवीगाळ केली. तसेच तुमची गाडी पेटवून देईल अशी धमकी दिली. याप्रकरणी १९ मार्च रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात देविदास इंगळे यांनी धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राकेश सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.