
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात मंगल मैत्री ग्रुपच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व भव्य मिरवणुकीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण आणि समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हरी विठ्ठल नगर येथील बाजारपेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून सामाजिक समतेचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते. उद्घाटक म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते कैलास हटकर व भारत सोनवणे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत रमाई यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला अधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटक डॉ. अमृता सोनवणे यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, महिलांनी आत्मसन्मानाने जगणे, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य घडवणे आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणे, हा माता रमाई आंबेडकर यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समतेसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंगल मैत्री ग्रुपच्या महिलांनी केल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्या झनके यांनी केले. त्यानंतर डॉ. अमृता सोनवणे यांच्या हस्ते मिरवणुकीस झेंडा दाखवून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. पुष्पांनी सजवलेल्या घोडागाडीत विराजमान माता रमाई आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी केक कापून उपस्थित महिलांनी एकमेकींना केक भरवत आनंद व्यक्त केला.
मिरवणुकीदरम्यान महिला, पुरुष तसेच आबालवृद्धांनी डिजेच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. उपस्थितांच्या आग्रहास्तव प्रमुख अतिथींनीही नृत्यात सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष संपूर्ण परिसरात घुमत होता.
ही मिरवणूक हरी विठ्ठल नगर बाजारपेठ येथून राजीव गांधी नगर, वाघ नगर स्टॉप मार्गे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून पुढे चित्रा चौक, टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शोभा इंगळे, उषा इंगळे, प्रमिला इंगळे, उषा तायडे, विद्या झनके, उज्वला सपकाळे, शैला पारधे, शोभा पातुडे, छाया इंगळे, आकाश तायडे, आकाश झिने यांच्यासह मंगल मैत्री ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास माँ शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा अंभोरे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बिऱ्हाडे यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.



