Home Cities जळगाव रामनवमी उत्सव जल्लोषात ; विहिंप-बजरंग दलाचा भव्य सोहळा

रामनवमी उत्सव जल्लोषात ; विहिंप-बजरंग दलाचा भव्य सोहळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त भक्ती, उत्साह आणि एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महापूजा आणि महाआरती कार्यक्रमामुळे संपूर्ण शहर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेले.

२६ मार्च रोजी आयोजित या सोहळ्याची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या विधिवत महापूजेने झाली. पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चारात पार पडलेल्या या पूजेनंतर उपस्थित शेकडो भाविकांच्या साक्षीने भव्य महाआरती करण्यात आली. आरतीच्या वेळी निर्माण झालेल्या मंगलमय वातावरणामुळे परिसर पूर्णतः भक्तीमय झाला होता. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने विशेषतः तरुणांमध्ये उत्साह उसळलेला पाहायला मिळाला. कार्यक्रमानंतर आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या धार्मिक उत्सवाला जळगाव शहरातील राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, नगरसेविका सुचिता हाडा आणि निलेश तायडे यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच विश्व हिंदू परिषदेचे योगेश्वर गर्गे, सहमंत्री ललित चौधरी, विभाग मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र, जिल्हा मंत्री राकेश लोहार यांच्यासह इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक नखाते, नितीन गणापुरे, अजित राणे, अमित भाटिया आदी मान्यवरांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. सार्वजनिक स्वरूपात साजरे होणारे असे उत्सव समाजातील बंधुभाव वाढवतात आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्यास मदत करतात, असे आयोजकांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound