इंदूर (वृत्तसंस्था) रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामायण’मालिकेत प्रभूरामचंद्रांची भूमिका साकारणारे अरुण गोविल लवकरच राजकारणाच्या मैदानात दिसू शकतात. ते काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विरोधात इंदूरमधून अरुण गोविल यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे.
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यालयातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्राप्त झाले आहे. काँग्रेसच्या बैठकीमध्ये इंदूरच्या जागेसाठी अरुण गोविल यांच्या नावाचा विचार करण्यात आला. मध्य प्रदेशात १५ वर्षानंतर सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत २० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवले आहे. इंदूर हा भाजपाचा बालेकिल्ला असून सुमित्रा महाजन सलग आठवेळा या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. भोपाळ आणि इंदूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांनी नेहमीच भाजपाला साथ दिली असून मागच्या ३० वर्षात काँग्रेसला इथे एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकता आलेली नाही. अरुण गोविल यांना इंदूरमधून उमेदवारी दिली तर ते गेमचेंजर ठरतील, असे काँग्रेसच्या एका गटाला वाटते.