महाराष्ट्रात राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यायच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी भाजपच्या वतीने धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन जागांसाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांमध्ये गोयल यांच्या जागेवर राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय आणखी एका उमेदवाराने अर्ज भरला आहे तर उदयनराजे भोसले यांच्या जागेवर भाजपच्या धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी केली जाईल.

तीन उमेदवारांच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या आवश्यक सह्या नसल्याने ते अर्ज बाद ठरतील आणि उर्वरित दोन अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरून त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट अशी आहे. त्यामुळे या मुदतीनंतर उमेदवारांच्या निवडीची घोषणा केली जाईल. या पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

Protected Content