भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रजनीताई संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ आज (26 नोव्हेंबर, बुधवार) प्रभाग क्रमांक 13 मध्ये जोरदार प्रचार केला गेला. उमेदवार नंदा निकम, होजादेवी आणि कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या विकासदृष्टिकोनाची माहिती दिली.
प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध मोर्चे-आघाड्यांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा शहराध्यक्ष संदीपदादा सुरवाडे, किरणभाऊ कोलते, सरचिटणीस पवनभाऊ बुंदेले, अमोलभाऊ महाजन, जयंतराव माहुरकर आणि सागरभाऊ चौधरी यांनी या दौऱ्याचे नेतृत्व करून मतदारांशी संवाद साधला.

प्रचाराची सुरुवात प्रभाग 13 मधील रेणुका माता मंदिर परिसरातून झाली. त्यानंतर गुर्जर कॉलनी, रिंग रोड, शिवदत्त नगर या भागांत प्रत्येकी ठिकाणी नागरिकांशी भेट घेऊन महायुती सरकारची कामगिरी आणि स्थानिक विकासासाठी आखलेल्या योजना याबाबत माहिती देण्यात आली. रजनीताई सावकारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सर्वसमावेशक विकासाला गती देण्यात येईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रभागातील नागरिकांनी या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांशी संवाद साधला. नागरिकांशी संवादादरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षाविषयक सुविधा, महिला-सुरक्षा यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली. प्रभागातील काही ठिकाणच्या अपूर्ण कामांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
प्रचारादरम्यान उमेदवार नंदा निकम यांनी नागरिकांचा विश्वास जिंकण्याचे प्रयत्न करत महिलांच्या सुरक्षेसाठी भुसावळ शहरात अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्यावर भर दिला. होजादेवी आणि कार्यकर्त्यांनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधत रजनीताई सावकारे यांच्यावरील नागरिकांचा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यापासून महायुतीतर्फे प्रभागवार प्रचार मोहीम राबवली जात असून आगामी दिवसांमध्ये प्रचाराचा वेग आणखी वाढणार आहे. भुसावळकरही या निवडणुकीकडे उत्सुकतेने पाहत असून कोणत्या बाजूने सत्ता झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



