पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे येथून अटक करण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अनेक दिवसापासून या प्रकरणातील आरोपी असलेल्या बियाणी कुटुंबीय पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले होते. अभिषेक बियाणी याला आता बीडला घेऊन जाणार असून या प्रकरणातील तपासाला अधिक वेग येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरण ताजे असतानाच राजस्थान मल्टीस्टेट घोटाळ्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी लातूर, परळी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. बीड मधील अनेक गुंतवणूकदाराचे पैसे या बँकांमध्ये अडकले आहेत. ठेवी अडकल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना देखील पुण्यातून अटक झाली होती. आता राजस्थानी मल्टीस्टेट संदर्भात अभिषेक बियाणी याला अटक झाली आहे.