मुंबई (वृत्तसंस्था) भाजपची कोंडी करू पाहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची पोलखोल करणे भारतीय जनता पक्षाने सुरु केले आहे. राज यांनी मुंबईतील सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याची दखल घेत हा फोटो भारतीय जनता पक्ष किंवा सरकारच्या अधिकृत जाहिरातीमधील नाही, तसेच तो कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झालेला नाही, असा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
मग, हा फोटो नेमका आला कुठून, या प्रश्नाचे उत्तर देताना तावडे म्हणाले की, ‘एखाद्या मोदीप्रेमीने तो सोशल मीडियावर पोस्ट केलेला असू शकतो. अशा पद्धतीने जाहिरातीत फोटो वापरल्याचे आमच्या लक्षात आले, हे चिले कुटुंबातील सदस्यांनीच स्वत:हून सांगितले आहे. त्यामुळे यात राज ठाकरे यांनी काहिही शोधून काढलेले नाही, त्यांनी तसा आव आणू नये, असा टोलाही तावडे यांनी लगावला आहे. राज यांनी अलीकडे आपल्या सभांमधून शिवसेनेलाही मतदान करू नका, असे सांगायला सुरुवात केली आहे, असे सांगत राज यांनी गेले दोन दिवस घेतलेल्या गॅपमध्ये नवे डीलिंग करून हे अॅडिशन टाकले असावे, असा आरोपही तावडे यांनी केला आहे.
हा तर कॉमेडी शो :- राज ठाकरेंनी आता २७ एप्रिलनंतरही आपल्या सभा सुरूच ठेवाव्यात. याचे कारण म्हणजे त्यांच्या टुरिंग टॉकीजमुळे लोकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे. तसेही ते निवडणुका लढवत नसल्याने ही स्टँडअप कॉमेडी सुरू ठेवायला काही हरकत नाही, अशा शब्दांत तावडे यांनी राज यांना कोपरखळ्या मारल्या.