मुंबई (वृत्तसंस्था) कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थोड्यावेळापूर्वीच ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, ऐनवेळी विरोध प्रदर्शन केले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मनसेचे संदीप देशपांडे यांच्यासह विविध भागातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. तर मनसे ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव,शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.