पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्यानंतर अनेक ठिकाणी अचानक पाणी पातळी वाढली. घरांमध्ये पाणी शिरले असून काही ठिकाणी पुराने वेढलेल्या पाण्यात लोक घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील शाळांना सुट्या देण्यात आल्या आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितला देवी मंदिर, डेक्कन, संगम पूलसमोरील वस्ती, कॉर्पोरेशनजवळील पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले. एकतानगर भागात बचावकार्य करण्यासाठी दाखल झालेल्या लष्कराच्या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी, नागरी प्रशासन. इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लष्कराच्या कृती दलामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट, वैद्यकीय पथके सहभागी आहेत. लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. तसेच मदतीसाठी भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार कमी वेळेत घटनास्थळी पोहोचतील.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही केले आहे. खडकवासला धरणातून ३५ हजार ५७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाची संततधार सुरूच राहिली तर यात वाढ केली जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन कक्षात दाखल झाले असून जिल्ह्यातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत आहेत.