मुंबई प्रतिनिधी | येत्या चार-पाच दिवसात राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यात जळगाव जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी राज्यात पावसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होणार असल्याचा अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना अशा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अहमदनगर, बीड, परभणी, अकोला, अमरावती, जळगाव, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, हिंगोळीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे.
जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. मात्र काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. या पार्श्वभूमिवर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचे दिसून येत आहे.