Home Cities जळगाव धूलिवंदनात रंगांचा पाऊस; जळगावात होणार अनोखा रंगोत्सव

धूलिवंदनात रंगांचा पाऊस; जळगावात होणार अनोखा रंगोत्सव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रंगांचा सण असलेल्या धूलिवंदनाचा उत्साह यंदा जळगाव शहरात विक्रमी स्वरूपात अनुभवायला मिळणार असून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धूलिवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात कानपूरहून खास मागवण्यात आलेले नैसर्गिक रंग, हवेत रंगांची उधळण करणारे विशेष सिलिंडर्स आणि पारंपरिक ते आधुनिक संगीताचा संगम जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे.

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे खान्देश सेंट्रल मॉल येथे मंगळवार, दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मोफत धूलिवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथून १४ प्रकारातील तब्बल ७०० किलो नैसर्गिक रंग मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रंगांच्या माध्यमातून हवेत रंगांची उधळण करणारे ३० सिलिंडर्स वापरले जाणार असून त्याद्वारे आकर्षक फायर शो सादर केला जाणार आहे. हा फायर शो धूलिवंदनाच्या उत्साहात भर घालणारा ठरणार आहे.

कार्यक्रमादरम्यान पारंपरिक ढोल-ताशांसोबत पंजाबी ढोल आणि डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसणार आहे. “बुरा न मानो होली है” च्या गजरात रंगांची उधळण आणि संगीताचा जल्लोष यामुळे वातावरण रंगमय होणार आहे. आयोजकांनी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिली असून सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्याची तयारी केली आहे.

या भव्य आयोजनाबाबत माहिती देताना युवाशक्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी सांगितले की, जळगावकरांसाठी दरवर्षी धूलिवंदनाचा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरतो. यंदा नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित धूलिवंदन साजरे करण्यावर भर देण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रंगोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या या भव्य आयोजनामुळे जळगावकरांना रंग, संगीत आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. नैसर्गिक रंगांचा वापर, आकर्षक फायर शो आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हा धूलिवंदन सोहळा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound