भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील मंडळ रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयासमोर रनिंग स्टाफ कर्मचारी म्हणजेच लोको पायलट व ट्रेन मॅनेजर यांच्या प्रलंबित व ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरयूएम) भुसावळ मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. ५ रोजी सायंकाळी सहा वाजता तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
रनिंग स्टाफ कर्मचाऱ्यांना सलग नऊ तास ड्युटीनंतर तात्काळ रिलीफ देण्याची ठोस व्यवस्था करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच रनिंग स्टॉपला रिलीफ दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील मुख्य डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी मेन एक्सप्रेस गाडीची सोय करण्यात यावी, अशी मागणीही युनियनने लावून धरली. ट्रेन मॅनेजर यांना देण्यात आलेल्या शिक्षेस तत्काळ रद्द करावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

याशिवाय मंडळ परीचालन व्यवस्थापक, भुसावळ यांनी ट्रेन मॅनेजर यांच्याशी दबाव व धमकीची भाषा वापरणे तात्काळ बंद करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. रनिंग स्टाफकडून दररोज ११ ते १२ तास काम करून घेण्याची अन्यायकारक पद्धत त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा कामगारांमध्ये तीव्र असंतोष वाढेल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने रनिंग स्टाफ कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशासनाकडून लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामाच्या ताणाचा तसेच सतत वाढवलेल्या कामकाजाच्या तासांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे युनियनने अधोरेखित केले.
युनियनच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, वरील मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. अशा परिस्थितीत रेल्वे संचालनात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी माहिती एनआरयूएम मंडळ सचिव वाय. एस. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
एकूणच, रनिंग स्टाफच्या कामाच्या तासांबाबत, रिलीफ व्यवस्थेबाबत व प्रशासनाच्या वागणुकीबाबत वाढता रोष या आंदोलनातून स्पष्टपणे समोर आला असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज अधोरेखित झाली आहे.



