जळगाव प्रतिनिधी । मुंबई डाऊन रेल्वे लाईनवर गिरणा पंपिंग रस्त्यावरील बोगद्याजवळ रविवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. सोमवरी मयताची ओळख पटली असून सदर तरुण हा हरिवठ्ठल नगर भागातील असून त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. यशराज प्रवीण पाचपोळ (वय 18, रा. गिरणापंपींग रोड, वाघनगर) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत माहिती अशी की, गिरणा पंपींगकडे जाणार्या रस्त्यालगत वाघनगर येथील राहत्या घरुन यशराजने बाहेर जावून येतो असे आईला सांगून सकाळी 11 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला. मात्र रात्री उशीरापर्यंत यशराज परतला नाही, म्हणून कुटुंबियासह नातेवाईक तसेच मित्र परिवाराने शोध सुरु केला. मात्र त्यांची कुठलीही माहिती मिळाली नाही. दुसर्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रामध्ये रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची बातमी वाचल्यावर कुटुंबियांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी कर्मचारी अनिल फेगडे यांनी कुटुंबियांनी घटनास्थळी सापडलेले चप्पल, कमरेचा पट्टा, व जिन्सपॅन्टसह शर्टाचे तुकडे दाखविले. त्यानुसार तो यशराज असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आईसह वडील तसेच मोठ्या भावाने जिल्हा रुग्णालय गाठून एकच आक्रोश केला.
विज्ञान शाखेतून नुकताच 60 टक्क्यांनी उत्तीर्ण
यशराजचे वडील प्रविण जुलाल पाचपोळ यांचा मल्हार अॅक्वा नावाने व्यवसाय आणि किराणा दुकानाचे काम बघतात. त्यांच्या या कामात त्यांना मोठा मुलगा रोशन आणि यशराज दोघेही मदत करत होते. यशराज शिक्षणही पूर्ण करत होता. त्याने बनोटी येथील जेएमएस या महाविद्यालयात यशराजने बाहेरुन बारावीसाठी प्रवेश घेतला होता. नुकताच निकाल लागला. त्यात 60 टक्क्यांनी तो उत्तीर्ण झाला होता. रविवारी यशराजने काहीही एक न सांगता घरातील देव्हार्यात त्याचे पाकिट व मोबाईल ठेवला व निघून गेला. दुसर्या दिवशी आत्महत्येचे कळले. सर्व काही सुरळीत असताना यशराजने आत्महत्या का केली हे गुलदस्त्यात आहे.