भुसावळ, वृत्तसंस्था | पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आज (दि.१६) येथील रेल्वे स्थानकावर दुपारी ४.०० च्या सुमारास रेल रोको आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईकडून भुसावळला येणारी ‘काशी एक्सप्रेस’ ही प्रवासी रेल्वे आडवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न अयशस्वी केला. त्यामुळे गाडी थांबल्यावर फलाटावर हे आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे नेते जगन सोनवणे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांना होणारा त्रास, शेतकऱ्यांना येणारे वाढीव वीज बिल, दूषित पाणीपुरवठा, स्कूल बसला होणारा त्रास, तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, रेल्वे अप्रेंटिस कामगारांना कामावरून कमी करणे, अशा विविध मागण्यांसाठी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये ३.३० ला येणारी ‘काशी एक्सप्रेस’ प्लॅटफॉर्म नंबर ६ वर आल्या-आल्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ह्या गाडीचा रस्ता अडवण्यात आला व जोपर्यंत ह्या मागण्या सरकार मान्य करत नाही तोवर गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका जगन सोनवणे यांनी घेतली. प्रशासनाच्या वतीने यांना आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी सोनवणे यांनी दिला आहे.