भुसावळ, प्रतिनिधी | रेल्वे हायस्कुलच्या शिक्षकाने प्रश्न विचारण्याचा राग आल्याने विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे इंग्रजी माध्यम शाळेत काल दि.२४ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी घडली.
शाळेतील इयत्ता ११ वी वर्गाची विद्यार्थिनी व रेल्वेचे तिकीट तपासणीस मो.आबिदुल्ला खान यांची मुलगी जोया अलविना (वय१६) या विद्यार्थिनीने शिक्षक सुकांत मिश्रा यांना प्रश्न विचारला. मात्र, शिक्षकाने त्याचे उत्तर देण्याऐवजी विद्यार्थिनीला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत यापुढेही अशाच पद्धत्तीने त्रास देईल, अशी धमकी दिली. विद्यार्थिनीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयीत शिक्षकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी विद्यार्थिनीस उपचार व प्रमाणपत्रासाठी प्रथम वरणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टर नसल्याने या विद्यार्थिनीस जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. यापुर्वी सुध्दा या शिक्षकाने विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याच्या विरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात मोठ्याप्रमाणात तिकीट तपासणीसानी धाव घेत कडक कारवाईची मागणी केली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.