Home क्राईम ‘एल के. फार्म’वर छापा : माजी महापौर ललित कोल्हे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

‘एल के. फार्म’वर छापा : माजी महापौर ललित कोल्हे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

0
481

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ममुराबाद रोडवरील एल के. फॉर्म येथे ऑनलाईन फसवणुकीसाठी बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कॉल सेंटरचा मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या आमिषांनी फसवण्याचा हा ‘हायटेक’ गोरखधंदा उघडकीस आला आहे.

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी (२७ सप्टेंबर) या बोगस कॉल सेंटरबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर, त्यांनी तात्काळ हालचाली करत आज रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एल के. फॉर्मवर छापा टाकला.

पोलिसांनी धाड टाकली असता, या ठिकाणी ३१ लॅपटॉपसह संपूर्ण कॉल सेंटरचा सेट-अप आढळून आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत हे कॉल सेंटर विदेशी लोकांना लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला ‘अधिकृत एजंट’ असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडा घालत होते.

या छाप्यात पोलिसांनी सध्या उपस्थित असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, फॉर्मचे लोकल मालक ललित कोल्हे यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, या कॉल सेंटरमध्ये एकूण २० ते २५ जण काम करत होते. अटक झालेले बहुतांश आरोपी हे राज्याबाहेरील रहिवासी असल्याचेही निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे या टोळीचा आंतरराज्यीय स्तरावर फैलाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पोलीस आता कायदेशीर चौकशी करत असून, या फसवणूक रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, कॉल सेंटरमधून जप्त केलेला डेटा आणि उपकरणे यांची कसून तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या या धडक कारवाईमुळे जळगावात चालणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या मोठ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे.


Protected Content

Play sound