Home Cities अमळनेर खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या तिन्ही माध्यमिक शाळांच्या ‘शिक्षक प्रतिनिधी’ पदाची निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली. या चुरशीच्या लढतीत राहुल जगतराव पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवून विजयावर मोहोर उमटवली आहे. २६ तारखेला जी.एस. हायस्कूल येथे ही मतदान प्रक्रिया पार पडली.

निवडणूक प्रक्रिया आणि मतदान संस्थेच्या कायम शिक्षक संघाच्या अंतर्गत ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. एकूण ७५ शिक्षक मतदारांपैकी ७२ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला, तर एक मत अवैध ठरले. या निवडणुकीत एकूण ६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते, त्यामुळे ही निवडणूक अधिक रंजक झाली होती.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राहुल पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कायम शिक्षक संघाचे अध्यक्ष आर. जे. पाटील, सचिव उमाकांत हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली के. आर. बाविस्कर, एल. सी. बंजारा आणि व्ही. एच. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चोख जबाबदारी बजावली. राहुल पाटील यांची शिक्षक प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पाटील यांची निवड योग्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound