नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राफेल डीलवरुनकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मोदी सरकारला लक्ष्य करताच भाजपानं जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी पत्रकार परिषदेत फक्त आणि फक्त खोटं बोलले. खोटं बोलण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तसेच राहुल गांधी प्रतिस्पर्धी कंपनीसाठी लॉबिंग करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी एअरबस कंपनीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या सरकारचा इतिहास तपासून पाहावा, असा सल्ला रवीशंकर प्रसाद यांनी दिला. ‘राहुल गांधी प्रतिस्पर्धी कंपनीसाठी लॉबिंग करत आहेत. त्यांना एअरबस कंपनीच्या ई-मेलची माहिती कुठून मिळाली? एअरबस कंपनीसोबत यूपीए सरकारनं करार केला होता, तो करार संशयास्पद आहे. राहुल यांनी पत्रकार परिषदेत ज्या ई-मेलचा उल्लेख केला, तो ई-मेल हेलिकॉप्टरसाठी करण्यात आला होता. एअरबस कंपनीवर दलाली दिल्याचा आरोप आहे. त्याचा तपास सध्या सुरू आहे,’ असंही प्रसाद म्हणाले.
संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एका कंपनीचा ई-मेल राहुल यांच्याकडे आहे. त्यांच्या खोटेपणाचा आम्ही लवकरच पर्दाफाश करू, असं प्रसाद यांनी जाहीर केलं. यावेळी ‘प्रामाणिकपणा आणि देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या मोदींविरोधात राहुल यांनी जी भाषा वापरली, त्याचं उत्तर त्यांना जनतेकडून मिळेल,’ असं प्रसाद म्हणाले. राफेल डीलशी संबंधित गोपनीय माहिती अनिल अंबानींना दिल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधानांनी गोपनीयतेचा भंग केल्याचं राहुल म्हणाले होते.