नवी दिल्ली वृत्तसंस्था । ‘चौकीदार चोर है’ या घोषणे प्रकरणी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली असून याची आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
राफेल प्रकरणी राहूल गांधी यांनी दिलेली ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा देशभरात गाजली. मात्र याला विरोधदेखील करण्यात आला. राफेल प्रकरणी निर्णयानंतर सुप्रीम कोर्टानंही चौकीदार चोर असल्याचं मान्य केल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल यांनी असं वक्तव्य करून कोर्टाचा अपमान केल्याचं सांगत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुप्रीम कोर्टानं राहुल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर आज तीन पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा बिनशर्त माफी मागितली आहे.
या प्रतिज्ञापत्रात राहूल गांधी यांनी नमूद केले आहे की, ‘अनावधानानं कोर्टाच्या हवाल्यानं चौकीदार चोर है… बोललो. तसा माझा कोणताही हेतू नव्हता.’ विशेष म्हणजे याआधीही राहुल यांनी कोर्टात दोन प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, त्यात माफी मागितली नव्हती, तर दिलगिरी व्यक्त केली होती. आज मात्र त्यांनी या प्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे.