नवी दिल्ली – वृत्तसेवा। अमेरिका येथील न्यूयॉर्क फेडरल कोर्टामध्ये अदानी समूहावर 2000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. यावर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी भाजप आणि अदानी यांच्यातील संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि त्यांच्या इतर सात भागीदारांवर मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि लाचलुचपत प्रकरणी आरोप केले आहेत. कोर्टाने केलेल्या सुनावणीत सांगितले की अदानी समूहाने भारतात सोलर एनर्जी प्रकल्पांचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 2200 कोटी रुपयांची लाच देण्याची योजना आखली होती. याबाबत राहूल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, “अदानी आणि भाजप सरकारमधील संबंधांवर जॉइंट पार्लियामेंटरी कमिटी (जेपीसी) स्थापन करून तपास होणे गरजेचे आहे.” त्यांच्या मते, अदानींनी भाजपला मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
राहुल गांधींच्या मते, अदानी समूहाची ताकद इतकी आहे की पंतप्रधान मोदी त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ आहेत. “अदानींनी भारताच्या आर्थिक प्रणालीला हायजॅक केले आहे,” असे ते म्हणाले. “अमेरिकेच्या FBI ने या प्रकरणाची चौकशी केली आहे, परंतु भारतात अदानींवर कोणतीही कारवाई झाली नाही. भाजपला मोठ्या प्रमाणावर फंडिंग देऊन ते आपल्या स्वार्थ साधत आहेत.”
राहुल गांधींनी SEBI प्रमुख माधबी बुच यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या मते, “माधबी बुच यांनी अदानी समूहाच्या गैरव्यवहारांवर पांघरूण घातले आहे. प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराला हे समजले पाहिजे की त्यांच्या अपयशामुळे गुंतवणुकीला धोका निर्माण झाला आहे.अमेरिकेतील हा प्रकार फक्त सुरुवात आहे. अदानींचे व्यवहार बांगलादेश, श्रीलंका, आणि केनियामध्येही संशयास्पद आहेत. मोदी ज्या देशांना भेट देतात, तिथे अदानींना फायदे मिळतात. हे सर्व हळूहळू उघड होईल.”
राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची विश्वासार्हता संपल्याचा आरोप केला. “मोदी सरकार अदानींना वाचवत आहे. जर पंतप्रधानांनी अदानींवर कारवाई केली तर त्यांनाही त्याचा फटका बसेल,” असे ते म्हणाले.
अमेरिकेतील कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोलर एनर्जी प्रकल्पाच्या कंत्राटांसाठी भारतीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाच दिली किंवा देण्याचा प्रयत्न केला. यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
SEBI च्या चेअरपर्सन माधबी बुच यांच्यावरही या प्रकरणात निष्क्रियतेचा आरोप झाला आहे. राहुल गांधींच्या मते, “SEBI ने गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलली नाहीत. त्यांनी अदानी समूहाच्या गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष केले.”
राहुल गांधींनी अदानी घोटाळ्याच्या संपूर्ण चौकशीसाठी संसदेतील संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यामते, यामुळे देशातील भ्रष्टाचार आणि आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश होऊ शकतो.