नवी दिल्ली (वृत्तसेवा) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची जोरदार मागणी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत पुन्हा करण्यात आली आहे. परंतु, काँग्रेसच्या अध्यक्षपदी राह्यचंच नाही, असं सांगत राहुल निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे राहुल यांचं मन वळवण्यात काँग्रेसच्या ५१ खासदारांना अपयश आलं आहे.
काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित असलेल्या ५१ खासदारांनी राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची जोरदार विनंती केली. तर लोकसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ तुमचा एकट्याचा पराभव नसून ही पक्षाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी राहुल यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल यांनी पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी आपली असल्याचं सांगत काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार नसल्याचं स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव आणि अमेठीतून स्वत:च्या झालेल्या पराभवामुळे राहुल यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनामा मागे घ्यावा म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना अनेकदा विनवण्याही केल्या. मात्र राहुल यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं होतं. आजही खासदारांच्या बैठकीत इतर विषयांऐवजी राहुल यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरच अधिक चर्चा झाली. यावेळी राहुल यांनी पुन्हा एकदा राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.