Home Cities अमळनेर पाण्याचे शिंतोडे उडाल्यावरून राडा : एकाच कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण

पाण्याचे शिंतोडे उडाल्यावरून राडा : एकाच कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील ख्वाजा नगर भागात बोरिंगचे पाणी अंगावर उडाल्याच्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबाला शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिलेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, ख्वाजा नगरातील रहिवासी फरजाना जाफर बेलदार (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची नणंद जरीना बेलदार या अंगणात बोरिंगच्या नळीने पाणी मारत होत्या. यावेळी पाण्याचे काही शिंतोडे शेजारी राहणाऱ्यांच्या अंगावर उडाले. या शुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या शकीलोद्दिन मुजावर, जाकीरोद्दीन मुजावर, सोईलोद्दीन मुजावर आणि शोएब मुजावर यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दगडाने केला हल्ला:
वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. संशयित आरोपींनी फरजाना बेलदार यांच्यासह त्यांचे पती जाफर बेलदार, गुलबाने बेलदार आणि रियासतबी बेलदार यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर संतापलेल्या आरोपींनी डोक्यात दगड घालून फिर्यादीच्या कुटुंबाला रक्ताळले. “पुन्हा अंगावर पाणी उडाले तर जीवे ठार मारू,” अशी धमकीही यावेळी देण्यात आली.

पोलीस कारवाई:
घटनेनंतर जखमींनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करत आहेत. शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आधीच सतर्क असताना, अशा किरकोळ कारणावरून झालेल्या भीषण मारहाणीमुळे ख्वाजा नगर परिसरात तणावाचे वातावरण होते.


Protected Content

Play sound