अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील ख्वाजा नगर भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. आपल्या आईच्या अंगावर सांडपाणी फेकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहिलोद्दीन शकीलोद्दीन मुजावर (वय ३२, रा. समता कॉलनी, ख्वाजा नगर) हे खाजगी नोकरी करतात. २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास, सोहिलोद्दीन यांच्या आई घरासमोरील अंगणात बसलेल्या होत्या. यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी अंगणात भांडी धुण्याचे पाणी मुजावर यांच्या आईच्या अंगावर फेकले. सोहिलोद्दीन यांनी या कृत्याबद्दल विचारणा केली असता, त्यांना प्रचंड राग आला. या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी सोहिलोद्दीन यांच्याशी वाद घालत अवाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन आरोपींनी सोहिलोद्दीन यांना बेदम मारहाण करून दुखापत केली.

या घटनेनंतर सोहिलोद्दीन मुजावर यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाफर बिस्मिल्ला बेलदार, अकबर बिस्मिल्ला बेलदार, गुल्लो आणि भुरी (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. ख्वाजा नगर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ. अशोक साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



