Home Cities जळगाव मन्यारखेडे येथील इस्कॉन मंदिरात ‘राधाष्टमी’ महोत्सव; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती

मन्यारखेडे येथील इस्कॉन मंदिरात ‘राधाष्टमी’ महोत्सव; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडे शिवारातील इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिरात रविवारी ३१ ऑगस्ट रोजी श्रीमती राधाराणी यांच्या पावन प्राकट्यदिनानिमित्त ‘श्री राधाष्टमी महोत्सव’ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या विशेष सोहळ्यामध्ये परिसरातील आणि जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, ज्यामुळे मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते.

या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या प्रांगणात श्री श्री राधा-माधवांचे विशेष अलंकारिक दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. राधाराणींच्या सुंदर मूर्तीला आकर्षक वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवण्यात आले होते, जे पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या पवित्र पर्वावर राधा-माधवांना विशेष अभिषेक दर्शन आणि ५६ भोग अर्पण करण्यात आले. भक्तांनीही उत्स्फूर्तपणे या सोहळ्यात सहभाग घेतला.

अभिषेक आणि भोग अर्पण केल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या महाआरतीमध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आणि ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे भाविकांना एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती मिळाली आणि त्यांनी इस्कॉन मंदिराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वर्षीच्या राधाष्टमी उत्सवाने मनारखेडे गावातील आणि जळगाव परिसरातील भक्तांमध्ये एक नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.


Protected Content

Play sound