
मुंबई (वृत्तसंस्था) राधाकृष्ण विखे पाटलांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला असून विखे पाटलांनी यापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेला आहे. आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षात आपली घुसमट होत होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केलीय.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, आपण विरोधी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या तो विधानसभा अध्यक्षांनी अद्याप मंजूर केलेला नाही. या पदावर राहण्यात आपल्याला आता स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे ते पद सोडून दिलेले आहे. त्या पदावर आता कोणाची वर्णी लावायची, हा काँग्रेसचा प्रश्न आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते भेटत असले तरी प्रत्येकवेळी राजकीय चर्चा असतेच असे नाही. जुने संबंध आहेत; त्यामुळे अनेक जण भेटतात आणि चर्चा करतात, असेही विखे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी विखे पाटलांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ते अहमदनगरमध्येच तळ ठोकून होते. सुजय विखेंसाठी त्यांनी फिल्डींग लावली होती. सुजय खासदार झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. विखे पाटलांच्या मुंबईतील निवासस्थानी आज काँग्रेसचे नाराज आमदार दाखल झाले होते. यामध्ये अब्दुल सत्तार, भारत भालके, शिवसेनेचे नारायण पाटील आणि माढाचे रणजित निंबाळकर उपस्थित होते. यावेळी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर नगर जिल्ह्यात विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.