Home Cities जळगाव आर.आर. आबांचे ‘सौजन्य’ अन् दादांची ‘धमक’; बाबूजींनी सांगितला कामाचा ‘तो’ खास किस्सा

आर.आर. आबांचे ‘सौजन्य’ अन् दादांची ‘धमक’; बाबूजींनी सांगितला कामाचा ‘तो’ खास किस्सा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “सकाळी दूरदर्शनवर जेव्हा विमान अपघाताची बातमी पाहिली, तेव्हा विश्वासच बसला नाही. पण जेव्हा २० मिनिटांनी अजितदादांच्या निधनावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा पायाखालची जमीन सरकली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्पष्टवक्ता, कामाचा धडाका असलेला आणि शब्दाला जागणारा ‘मर्द’ माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे,” अशा शब्दांत माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

दादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना बाबूजी म्हणाले की, दादांकडे कामाची एक वेगळीच ‘धमक’ होती. त्यांनी आर.आर. आबा (आबा) आणि दादांच्या कामातील फरकाचा एक किस्सा सांगितला. एका शासकीय कामासाठी आबांनी फोन करूनही काम झाले नव्हते, मात्र दादांनी फोन उचलून अधिकाऱ्याला “हो की नाही, ते आत्ताच सांगा” असे ठणकावून विचारल्यावर अर्ध्या तासात ते काम मार्गी लागले. हाच त्यांच्या प्रशासकीय जरबेचा पुरावा होता.

पवार साहेबांची ‘ती’ रणनीती:
ईश्वरलाल जैन यांनी एक अत्यंत महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “मी एकदा आदरणीय पवार साहेबांना विचारले होते की, भविष्यात आपल्याला सुप्रिया ताईंना प्रोजेक्ट करायचे आहे की दादांना? तेव्हा साहेबांनी स्पष्ट सांगितले होते की, ताई दिल्लीच्या राजकारणात राहतील आणि महाराष्ट्राची जबाबदारी अजितदादा सांभाळतील.” घरात आणि पक्षात पडलेल्या फुटीबद्दल बोलताना त्यांनी दुःख व्यक्त केले आणि सांगितले की, पक्षात फूट पडली तरी दादांच्या मनात आपल्याबद्दलची आपुलकी कधीही कमी झाली नव्हती.

लाडक्या बहिणींचा आधारवड हरपला:
राज्याच्या तिजोरीची स्थिती नाजूक असतानाही दादांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचे नियोजन ज्या पद्धतीने केले, त्याचे बाबूजींनी कौतुक केले. ते म्हणाले की, दादा अर्थमंत्री म्हणून अत्यंत कल्पक होते. संकटात सापडलेल्या महाराष्ट्राच्या तिजोरीला सांभाळून जनतेला न्याय देण्याचे कौशल्य त्यांच्याकडेच होते. आज त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी परिवारच नव्हे, तर महाराष्ट्रातील हजारो भगिनींनी आपला हक्काचा भाऊ गमावला आहे.

शेवटची भेट आणि वास्तव:
आपल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना बाबूजी म्हणाले की, जेव्हा त्यांच्या घरावर धाडी पडल्या होत्या, तेव्हा ते दादांना भेटायला गेले होते. त्यावेळी दादांनी अतिशय प्रांजळपणे सांगितले होते की, “बाबूजी, मी सध्या स्वतः संकटात आहे, मी स्वतःचे काही करू शकलो नाही, तुमच्यासाठी काय शब्द टाकणार?” ही त्यांची स्पष्टोक्ती आजही मनात घर करून आहे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारा असा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना व्यक्त करून त्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.


Protected Content

Play sound