बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सोनोटी येथील बुध्दविहाराचे काम अपुर्णावस्थेत आहे. बंद पडलेले काम तातडीने सुरू करून पुर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बौध्द समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनातून केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सोनोटी येथे तत्कालीन आमदार एकनाथराव खडसे यांच्या आमदार निधीतून बुद्ध विहार मंजूर झाले होते. याबाबतचा निधी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बोदवड यांच्याकडे प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने सदरचे बुद्धविहाराचे काम सुद्धा सुरू झाले. परंतू हे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण झाले नाही व आतापर्यंत अपुर्णच आहे. शिवाय योग्य ती काळजी न घेतल्याने सदरचे बांधकाम आजरोजी निकृष्ट स्वरूपाचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मंजूर असलेले बुद्ध विहार अपूर्णावस्थेत असल्याने समस्त समाज बांधव यांना विविध धार्मिक कार्यक्रम करताना नाहक अडचणी निर्माण होत आहेत.पुढील महिन्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून याआधी सदरचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे अपुर्ण बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण न झाल्याने आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सोनोटी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल बोदडे, श्रीकृष्ण बोदडे, भगवान तायडे हे उपस्थित होते. तर सदर निवेदनावर सोनोटी येथील समस्त बौद्ध समाज बांधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.