रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केल्या जात असून, या प्रकल्पांची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रकल्पाची कामे पूर्ण होऊनही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने या योजनेंतर्गत झालेल्या खर्चाचा नेमका उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रावेर तालुक्यातील ९१ गावांसाठी शासनाने ६६ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील ६४ कामांवर १७ कोटी ११ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, अनेक गावांमध्ये अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः आदिवासी भाग वगळता इतर ठिकाणी तुलनेने भरपूर पाण्याचे स्रोत असतानाही, मोठ्या प्रमाणावर ठेकेदारांमार्फत कामे हाती घेण्यात आली. परिणामी, हा प्रकल्प गरजांपेक्षा खर्चाचा मोठा खेळ वाटू लागला आहे.
रावेर पंचायत समितीतील पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी नियमित हजर राहत नसल्याने, संपूर्ण तालुक्यातील जबाबदारी केवळ दोन कनिष्ठ अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. यामुळे, या प्रकल्पांच्या कामगिरीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही देखरेख नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
कामे पूर्ण झाल्यानंतरही गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत नाही, त्यामुळे निधीचा योग्य उपयोग झाला का? हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कामांची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता वाढत चालली आहे. अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालावे आणि कामांची पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.