सावदा (ता. रावेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभरात “I LOVE MOHAMMAD” हे वाक्य लिहिल्यामुळे नागरिकांवर गुन्हे दाखल केल्याच्या घटनांमुळे संतप्त भावना निर्माण झाल्या असून, याविरोधात कौमी एकता फाऊंडेशनतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर फाऊंडेशनने 26 सप्टेंबर रोजी फैजपूर येथील मा. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अशा कारवायांवर त्वरित रोक लावण्याची मागणी केली आहे.
निवेदनात फाऊंडेशनने स्पष्ट केलं की उत्तरप्रदेशातील कानपूर येथे 25 जणांवर आणि गुजरातमधील ग्रोधा येथे तब्बल 88 जणांवर फक्त “I LOVE MOHAMMAD” लिहिल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फाऊंडेशनच्या मते, हे विधान कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह, असभ्य किंवा असंवैधानिक नाही. उलट, ते केवळ धार्मिक श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्याचा अभिव्यक्तीचा मार्ग आहे, जो ईद-ए-मिलाद (बारावफात) सणाच्या पार्श्वभूमीवर बॅनर आणि पोस्टर स्वरूपात मांडला जातो.

भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(a) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क प्राप्त आहेत. त्याचप्रमाणे, कलम 25 धार्मिक स्वातंत्र्याची हमी देतो, तर कलम 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करतो. या घटनात्मक तरतुदींना धरून, “मी मुहम्मदवर प्रेम करतो” हे विधान हा कुठलाही गुन्हा नसून एक प्रेमळ आणि श्रद्धेचा संदेश आहे. त्यामुळे अशा विधानांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा अवमान असून संविधानाच्या आत्म्यावरच घाला असल्याचे फाऊंडेशनने नमूद केले आहे.
फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात पोलिस प्रशासनाने सामाजिक सौहार्द आणि शांतता राखण्यासाठी अधिक संवेदनशीलतेने आणि समजुतीने अशा घटनांकडे पाहावे, असे आवाहन केले आहे. निष्कारण गुन्हे दाखल करणे समाजातील सलोखा बिघडवू शकतो, त्यामुळे अशा कारवायांना त्वरित आळा घालावा, अशी ठाम भूमिका फाऊंडेशनने मांडली.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव यांनाही सादर करण्यात आली आहे, जेणेकरून या प्रकरणाची सखोल दखल घेतली जाईल.
या निवेदनप्रसंगी कौमी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष व कार्यकर्ते शेख कुर्बान, शेख इरफान, सय्यद असगर, जावेद जानब, शेख हमीद, फारुख अब्दुल्ला, हनीफ बहवान यांसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



