जळगाव प्रतिनिधी । गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी रॉयल्टीची ऑर्डर काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणार्या पंटरला आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराने ३५ ब्रास मुरूम खोदण्यासाठी तहसील कार्यालयात रॉयल्टी भरून परवानगी मागितली होती. या परवानगीची ऑर्डर काढून देण्यासाठी तहसील परिसरात खासगी दलाल म्हणून काम करणार्या निलेश गोरख पाटील (रा. जिजाऊनगर, वाघ नगराजवळ जळगाव) याने तक्रारदाराला पाच हजार रूपयांची लाच मागितली होती. यावरून तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली होती. या अनुषंगाने संबंधीत खात्याच्या पथकाने निलेश पाटीलला लाच घेतांना रंगे हात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक जी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निलेश लोधी, हे.कॉ. अशोक अहिरे, पो.ना. मनोज जोशी, शामकांत पाटील, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, अरूण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.