Home धर्म-समाज गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा ‘गणपती स्पेशल’ निर्णय

गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा ‘गणपती स्पेशल’ निर्णय


पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुणेकरांसाठी आणि राज्यभरातून गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) ने यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रोची सेवा पहाटे दोनपर्यंत सुरु ठेवण्याचा आणि विसर्जनाच्या दिवशी सलग ४१ तास सेवा सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना रात्री उशिरा गणपती दर्शन व देखावे पाहण्यास मोठी सोय होणार आहे.

पुण्यातील गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. मानाचे पाच गणपती, त्यांचे भव्य मिरवणुकीतून दर्शन, आणि वेगवेगळ्या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी हजारो लोक पुण्याकडे ओढा घेतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हीच गर्दी लक्षात घेता, महामेट्रोने यावर्षी भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. खास बाब म्हणजे यंदा पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या नव्याने सुरु झालेल्या मार्गावरही मेट्रो चालणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई आणि स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू करण्यात आली आहेत, जी थेट मानाच्या गणपतीजवळ आहेत.

रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरु राहिल्यामुळे गणेशभक्तांना वाहतूक कोंडी किंवा वाहनांची गैरसोय न करता थेट मेट्रोने मध्यवर्ती भागात प्रवेश करता येणार आहे. शिवाय मंडई आणि कसबा या गर्दीच्या भागांत विशेष नियोजन करण्यात आले असून, मंडई येथे एक बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय केली जाणार आहे. यामुळे गर्दीचा ताण कमी होईल आणि गणेशभक्तांना अधिक सुलभतेने दर्शन घेता येईल. मेट्रोच्या फेऱ्याही याकाळात वाढवण्यात येणार आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी, म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी, मेट्रो सेवा सकाळी ६ वाजता सुरु होईल आणि सलग ४१ तास — दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत — अखंड चालू राहणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत, म्हणजेच २७ ते २९ ऑगस्ट या दरम्यान, मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत चालेल. तर ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सेवा सकाळी ६ ते पहाटे २ वाजेपर्यंत सुरु राहील.

ही विशेष वेळ आणि व्यवस्था पुणेकरांसाठी आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. महामेट्रो प्रशासनाने सर्व नागरिकांनी या सुविधेचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound