जळगाव प्रतिनिधी । नवीन उद्योग सुरु करण्यासाठी स्वत:च्या नवसंकल्पना असलेल्या इच्छूक विद्यार्थी तसेच नागरीकांकडून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रा (केसीआयआयएल) कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या माहिती पत्रकाचे प्रकाशन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांचे हस्ते आज करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर, सहायक कुलसचिव वि .वि. तळेले, प्रा .वि. वि. गिते, व निखील कुलकर्णी हे उपस्थित होते. या पत्रकाच्या अनुषंगाने प्राप्त हेाणाऱ्या प्रस्तावांपैकी उत्कृष्ट प्रस्तावांना रुपये एक लाख पर्यंतचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सदर नवउद्योजकांना या ठिकाणी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे कमीत कमी भांडवलात उद्योग उभे करता येऊ शकतो. यासाठी लागणाऱ्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, तसेच देशभरातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, उद्योग सुरु करण्यासाठी कार्यालयीन जागा, प्रयोगशाळा, पृथ्थकरण सुविधा (ॲनालिटीकल फॅसिलीटीज) पुरविणे तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याकरिता विद्यार्थी , शिक्षक तथा सर्वसामान्य नागरीक यांनी https://kciil-kbcnmu.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध तक्त्या प्रमाणे माहिती भरावी. या संकेतस्थळा व्यतिरीक्त केसीआयआयएल च्या सोशल मिडिया (Facebook, whatapp, Linkden, Instagram) येथे माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे अशी माहिती केंद्राचे संचालक प्रा.भुषण चौधरी व कार्यकारी अधिकारी मनवीनसिंग चढ्ढा यांनी दिली आहे.