जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी स्व. प्राचार्य डॉ. पी.एस. चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ‘सहवास’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात लेखक प्रा. गोपीचंद धनगर यांच्या सहवास पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रंजना सोनवणे, माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड, प्रभात चौधरी, विद्यापीठातील आंतर-महाविद्यालयीन अधिष्ठाता डॉ. साहेबराव भूकन, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी आणि उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून लेखक प्रा. गोपीचंद धनगर यांनी स्व. प्राचार्य डॉ. पी.एस. चौधरी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवन कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रभात चौधरी आणि माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि चौधरी सरांच्या आठवणी जागवल्या. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. पी.एस. चौधरी यांचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय प्रभावीपणे पार पडले, तर उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



