मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे पार पडले.

मुंबईचा सागरी वारसा सांगणाऱ्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’च्या पुढाकाराने हे पुस्तक संकलित करण्यात आले असून नामवंत इतिहासकार, लेखक, संशोधक, वास्तुरचनाकार यांनी लिहिलेल्या १८ प्रकरणांचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्या देशांनी समुद्रावर प्रभुत्व मिळवले त्यांची भरभराट झाली असे नमूद करून गतकाळातील भारताच्या समृद्धीचे श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जाते, असे राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.

आजवर अनेक शहरे बंदरांभोवती निर्माण झाली. बंदरांच्या विकासामुळे मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली असे सांगून राष्ट्र म्हणून देशाने केलेल्या प्रगतीचा धांडोळा घेताना भूतकाळातील आणि सध्याची बंदरे आणि गोदी यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो असे राज्यपालांनी सांगितले. काही शहरे उदयास कशी येतात व कालांतराने आपले महत्व गमावून विस्मृतीत कसे जातात हे देखील बंदरांच्या इतिहासावरून कळेल असे त्यांनी सांगितले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशावेळी देशातील बंदरांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भारतातील विविध बंदरे आणि गोदी यांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.

‘गेटवेज टू द सी’ या पुस्तकाने मुंबई क्षेत्रातील आपल्या प्राचीन बंदरांचा वैभवशाली वारसा आपल्यासमोर आणला असून सदर पुस्तकाचा महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस आपण विद्यापीठांच्या कुलगुरूंना करू असे राज्यपालांनी सांगितले. सुरुवातीला मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन के डी बहल यांनी पुस्तकाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला व्हाईस ऍडमिरल (नि.) इंद्रशील राव, संपादिका डॉ शेफाली शाह, सोसायटीच्या उपाध्यक्ष अनिता येवले, भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या प्रतिनिधी संगीता गोडबोले व लेखक उपस्थित होते.

Protected Content